जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद!

Foto
सलग तीन दिवसांच्या धो-धो पावसाने जिल्हा चिंब
जून -जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात जोरदार बरसणार्‍या पावसाने सप्टेंबर महिन्यातही लय कायम ठेवली. सर्वदूर पाऊस बरसला नसला तरी गेल्या तीन दिवसापासून पडणार्‍या धो-धो पावसाने जिल्ह्यातील मध्यम आणि लघु तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. तर औरंगाबाद आणि खुलताबाद तालुक्यात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली.
सलग तीन वर्षांच्या दुष्काळी परिस्थिती नंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. या पावसाने जिल्ह्याची पाणीटंचाई दूर झाली. दुष्काळाच्या झळांनी होरपळणार्‍या जिल्ह्याला पहिल्यांदाच दिलासा मिळाला होता. त्यामुळे गतवर्षी पाणी टँकरची संख्या ही मर्यादितच राहिली. यावर्षी तर एक जून पासून पावसाने प्रारंभ केला आहे. जून महिन्यात जिल्ह्याची सरासरी उडणार्‍या पावसाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ही संततधार सुरूच ठेवली. त्यामुळे यावर्षी रेकॉर्ड पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या तीन-चार दिवसात काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने गेल्या शनिवारपासून जोरदार हजेरी लावली. सलग तीन दिवस धो धो पाऊस कोसळत आहे. 
तापमानाचा पारा चढला!
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा काहीसा चढता राहिला. तर गेल्या आठवड्यापासून सूर्यदर्शन नाही होत आहे. त्याचबरोबर सकाळी ऊन तर दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळत असल्याचा अनुभव येतो. कालही दुपारी चांगलाच उकाडा जाणवत होता. तर सायंकाळी सहा सात वाजेनंतर तुफान पावसाला सुरुवात झाली. तब्बल दीड तास जोरदार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले तर अनेक दुकानात आणि घरातही पाणी शिरले. वादळी वार्‍याने झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर शहरातील दुभाजकावर लावलेली झाडेही उन्मळून पडली आहेत.
काल 12 मिमी पावसाची नोंद!
दरम्यान, काल जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला. सर्वाधिक 40.7 मिमी पावसाची नोंद खुलताबाद तालुक्यात झाली आहे. त्या खालोखाल औरंगाबाद 16 मिमी, वैजापूर 15.9,  पैठण 12.8, गंगापूर 12.3, सिल्लोड 6.9 तर सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यात 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या तीन महिन्यात कोसळणार्‍या पावसाने सप्टेंबर महिन्यातही आपली लय कायम ठेवल्याचे दिसते. गेल्या सात आठ दिवसात जिल्ह्यात 44.7 मिमी पाऊस पडला आहे.
यावर्षी रेकॉर्डब्रेक पाऊस! 
 पावसाने सर्व तालुक्यांची सरासरी ओलांडली असून खुलताबाद तालुक्यात तर सर्वाधिक 899 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल औरंगाबाद 872, सोयगाव 812, गंगापूर 750, कन्नड 735, पैठण 726, फुलंब्री 716, वैजापूर 667 तर सिल्लोड तालुक्यात 664 मिलिमीटर पाऊस आतापर्यंत पडला आहे. जिल्ह्यात सरासरी 156 टक्के पाऊस आतापर्यंत पडला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker